सुख या संतसमागमें

संत तुकाराम महाराज अभंग

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥
ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाहए अभ्यंतर मजजवळा ॥३॥
दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ती जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥॥

अर्थ :

संतांच्या संगतीत रहाणे हे खरे सुख होय.साधूंच्या संगतीत सर्वांनी भगवंतांचे नित्य कीर्तन, भजन करावे.
नामसंकीर्तनाने सर्व पापकर्मे नष्ट होतात, मनुष्य भक्तीप्रेमामध्ये सदैव डुलत रहातो. म्हणून आता मला कसलीच चिंता नाही, तूच आमचा माता,पिता आहेस.
बहीण, बंधू, चुलता आहेस. सर्व नातीगोती तुझ्यातच आहेत.
हे मी निश्चितपणे जाणले आहे की, तुला माझा विसर पडत नाही, तूच परमात्मा रुपाने माझ्या हृदयात राहून सदैव मला धीर देतोस. आत बाहेर तूच भरून राहिला आहेस.
यामुळे स्वप्नामध्ये देखील दुःख येत नाही, ४ मुक्ती माझ्यासमोर दासी म्हणून आल्या आहेत. याचे कारण म्हणजे भक्तिप्रेमामुळे तू आमच्या जवळ येऊन राहिला आहेस.
शेवटी तुकोबाराय म्हणतात, जेथे तुझ्या कीर्तनाचा जयघोष सुरु असतो, तेथील पाप नाहीसे होते. आम्हाला कशाचीच उणीव भासत नाही. या शुद्ध प्रेमरूपी रसाचे आम्ही आनंदाने सेवन करत आहोत.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥

Comments

Popular posts from this blog

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

झाली संध्या संदेह माझा गेला

वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ